ग्रामीण भागातील सोईच्या बस फेर्‍या सुरू करा,माजीमंत्री शोभाताई फडणवीस यांची मागणी

37

(मूल)
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने अलीकडेच शाळा सुरू केल्या परंतु ग्रामीण भागातील अनेक एस.टी. बस फेर्‍या बंद असल्याने ग्रामीण विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. असा आरोप माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केला आहे.
कोरोना संकटकाळात शासनाने एस.टी. बस सेवा बंद केली होती. अलीकडे मात्र संकट कमी झाल्याने शासनाने अनेक सेवा आणि सुविधा अनलॉक केल्या आहेत. या अंतर्गत चांद्यापासून बांद्यापयर्ंत प्रवासाची सेवा पुरविणारी राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस सेवा आणि कित्येक महिन्यापासून बंद असलेल्या माध्यमिक शाळाही सुरू झाल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातून शहराकडे धावणार्‍या अनेक एस.टी. बसेस बंद असल्याने तालुक्यातील अनेक गांवातील विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील एस.टी. सेवा सुरू करण्याची मागणी केली तेव्हा विभागाने ग्रामीण भागातील मोजक्या बस फेर्‍या सुरू केल्या परंतु विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणे सोईचे होईल अश्या वेळेत बस फेर्‍या सुरू न करता अवेळी सुरू केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही शाळेत ये जा करण्यास असर्मथ आहेत. नलेश्‍वर, पोंभूर्णा, हरांबा-उपरी, पिपरी दीक्षित, पेटगाव या गांवाकडे पूर्वी सोईच्या बस फेर्‍या सुरू होत्या. त्यामुळे याभागातील विद्यार्थ्यांना मूल, मारोडा, चिरोली, सावली, भेजगांव आणि बेंबाळ येथील शाळेत ये जा करणे सोईचे होत होते. अलीकडे माञ सोईच्या बस फेर्‍या बंद केल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यास नाहक त्रास होत आहे. लॉकडाऊनच्या काळात मोबाईल आणि नेटवर्कमूळे तर आता अनलॉकमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकार्‍यांमूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब गंभीर असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणारा आहे. असाही आरोप शोभाताई फडणवीस यांनी केला आहे. बंद असलेल्या बस फेर्‍या सुरू करण्याबाबत काही अधिकार्‍यांना सूचविले तेव्हा काही अधिकार्‍यांनी डिझेलचा तुटवळा असल्याचे सांगितले तर काहींनी प्रवासी नसल्याचे कारण सांगितले. ही दोन्ही कारण परिवहनाची सेवा पुरविणार्‍या महामंडळासाठी अशोभनिय असल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन सोईच्या बस फेर्‍या तातडीने सुरू कराव्या. अन्यथा आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल. असा इशारा माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी दिला आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या मागणी संदर्भात विभागीय नियंत्रक यांच्याशी अनेकदा संपर्क साधला, परंतु त्यांनी कोणाताही प्रतिसाद दिला नाही.