महाराष्ट्र : पहिली ते 12 वीच्या शालेय अभ्यासक्रमात 25% कपात, शिक्षण विभागाचा निर्णय

50

राज्यातली कोव्हिडची परिस्थिती आणि ऑनलाईन सुरु असणारं शिक्षण लक्षात घेत राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीसाठीच्या अभ्यासक्रमात कपात केलीय.पहिली ते 12 वी साठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.कोव्हिडची साथ सुरू झाल्यापासून राज्यात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. गेल्यावर्षीही यामुळेच अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली होती.संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर याही वर्षी ऑनलाईन अभ्यासच सुरू आहे. त्यामुळे अभ्यासक्रम कमी करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय.कमी केलेल्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

 

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या शाळा सुरू करण्याबद्दल एक नियमावली जाहीर केली होती.

कोव्हिड-मुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे. प्राधान्याचे विषय ठरवून वेळापत्रक तयार करण्यात यावं अशा सूचना याद्वारे देण्या आल्या होत्या.

केवळ कोव्हिड-मुक्त भागातील शाळा सुरू करता येऊ शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.