हत्तीरोग दूरीकरणाकरीता जिल्हा प्रशासन सज्ज Ø 1 जुलैपासून आरोग्य विभाग राबविणार विशेष मोहिम

30
चंद्रपूर दि. 30 जून : राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांच्या मार्गदर्शनाखाली हत्तीरोग दूरीकरणाकरीता सार्वत्रिक औषधोपचार विशेष मोहिम संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येत आहे.
हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीपासून संक्रमीत होणारा दुर्लक्षित आजार आहे. या आजारामुळे रुग्ण दगावत नसला तरी, हत्तीसारखे हात, पाय सुजणे, स्तनांवर सुज येणे, अंडवृध्दी होणे अशा प्रकारच्या शारिरीक विकृती येऊ शकतात. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा आजार असून रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परीणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक औषधांचे वर्षातून किमान एकदा सेवन करणे आवश्यक आहे.
सार्वत्रिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत दोन वर्षाखालील बालके, गर्भवती माता, एक आठवड्यापर्यंतच्या स्तनदा माता व अतीगंभीर आजारी व्यक्ती यांना वगळून संपूर्ण समुदायाला जेवणानंतर वयोमानानुसार तसेच उंचीनुसार अलबेंडाझोल व आयव्हरमेक्टीन, डी.ई.सी. या औषधांची मात्रा प्रत्यक्ष खाऊ घालण्यात येणार आहेत. याकरीता संपूर्ण जिल्हयात 3945 एवढे मनुष्यबळ घरोघरी जाऊन, व्यापारी संस्थाने, शासकीय-निमशासकीय कार्यालये, कारखाने ई. ठिकाणी भोजन अवकाशात, वयोगटानुसार प्रत्यक्ष गोळया खाऊ घालणार असून पर्यवेक्षणाची जबाबदारी 904 मनुष्यबळावर सोपविण्यात आली आहे.
तसेच हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेस सर्व मान्यवर पदाधिकारी, शासकीय-निमशासकीय अधिकारी, सर्व वैद्यकीय व्यावसायिक, महिला मंडळ, बचत गट, सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था यांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्ष दिलेल्या हत्तीरोग विरोधी औषधाचे सेवन करून हत्तीरोगाच्या निर्मुलनास हातभार लावावा. असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी कळविले आहे.
प्रशासनाचे आवाहन : जिल्हयातील हत्तीरोगाचे सद्यस्थितीचे अवलोकन करता दि. 1 ते 15 जुलै 2021 या कालावधीत होऊ घातलेल्या हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत जनतेने सहभाग दर्शवावा तसेच जिल्हयातील शासकीय-निमशासकीय संस्थांनी हत्तीरोगाचे समुळ उच्चाटनाकरीता सामाजिक बांधीलकी जपत सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डीले यांनी केले आहे.