यंदा शालेय पोषण आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार

53

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे.

मुंबई – भारत सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२०२२ च्या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सुटीसाठी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप थेट न करता विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडण्यात यावे. बँक खाते आधार लिंक आहेत किंवा नाहीत, लिंक नसल्यास आधार लिंक करावेत, तसेच विद्यार्थ्यांची बँक खाते उघडली नसल्यास त्यांचे आधार लिंक खाते उघडण्याचे आदेश शाळांना शिक्षण संचालनालयांनी दिले आहेत.

पालकांना मदत करण्याचे निर्देश-

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, जिल्हा परिषद हायस्कूल, अनुदानित, अंशतः अनुदानित सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक बॅक खाते उघडण्याबाबत शाळांनी हालचाली कराव्यात तसेच १ जुलै, २०२१ पर्यत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करून जिल्हास्तरावर जतन करण्यात यावी, व बँक खाते उघडण्याकरीता पालकांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले आहेत.

शिक्षक-पालकांच्या तक्रारी-

ऐन लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे शासन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र या काळात विद्यार्थ्यांची बँक खाते उघडण्याचे आदेश सर्व शाळांना दिल्याने बँकामध्ये गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती पालकवर्गांकडून व्यक्त होत आहे.