कोरोनाकाळात शेतकरी राबला म्हणून इतर जगले – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

32

Ø बांधावर जावून पालकमंत्र्यांचा “शेतकरी संवाद”

Ø खते व बियाणांचे वाटप, बीज प्रक्रिया व उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक

चंद्रपूर, दि. 20 : संपूर्ण जगावर तसेच देशावर आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे जनजीवन अक्षरशः थांबले. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला. मात्र या संकटातही केवळ कृषी क्षेत्रामुळे आपण तग धरु शकलो. कोरोनाकाळात शेतकरी बांधव राबला म्हणून इतर जगू शकले, असे विचार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी व्यक्त केले.

ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथे शेताच्या बांधावर आयोजित “शेतकरी संवाद” या कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी विभागाच्यावतीने बेटाळा येथील नरेंद्र ढोंगे यांच्या शेतावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. सदस्य स्मिता पारधी, राजेश कांबळे, न. प. सभापती विलास विखार, जिल्हा अधिक्षक कृषी भाऊसाहेब ब-हाटे, तहसीलदार विजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वेदना आणि अडचणी जाणून घेणे तसेच खरीप हंगामाच्या सुरवातीलाच प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून कृषी विभागामार्फ़त त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, बीज टाकण्यापासून ते उत्पादन हाती येईपर्यंत काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्पन्न जास्त घेण्याच्या लालसेमुळे रासायनिक खतांचा वापर वाढला. त्यामुळे शेतीची पत बिघडली. सेन्द्रिय शेती तसेच जैविक खतांचा वापर आज काळाची गरज झाली आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्यासाठी सलग दोन वर्षात 28 कोटी रुपयांची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली आहे. भविष्यात मजूरांची कमतरता जाणवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. शेतात निंबोळी अर्क टाकला तर 70 टक्के खर्च वाचतो व शेतकऱ्याची बचत होते. बचतीचा मार्ग प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे. त्यामुळे निंबोळी अर्क, उत्तम बियाणे, उगवण क्षमता याचे चांगले नियोजन करा. गोसेखुर्दमुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला फायदा होईल, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.

यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बीज प्रक्रिया, मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया, द्रवरूप जीवाणु संघ प्रक्रिया, धान बियाणांची उगवण क्षमता चाचणी बाबत कृषीसेवक पी. बी. बंगाळे यांनी तर 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्याबाबत श्री. सरोदे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते 50 टक्के अनुदानावर नरेंद्र ढोंगे, जनार्धन मिसार, मोरेश्वर पुस्सलवार, नामदेव दिघोरे या शेतकऱ्यांना धान बियाणे वाटप, विष्णुदास तलमले, लोकपाल तलमले आणि हिरालाल तलमले यांना ब्रीकेटचे वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्र्यांच्या हस्ते बांधावर हिरवळीच्या खताचा वापर करण्यासाठी ग्लीरीसीडीयाची लागवड, पेरणी यंत्राच्या सहाय्याने धानाची लागवड करण्यात आली.

यावेळी प्रमोद चिमुरकर, खेमराज तिडके, जितेंद्र राऊत, प्रभाकर शेलोकर, नितीन व-हाडे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.