ग्रामपंचायत बेंबाळ च्या सरपंच करुणा उराडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित

38

ग्रामपंचायत बेंबाळ च्या सरपंच करुणा उराडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित

मूल :-

सन 2017 मध्ये 11सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत बेंबाळ ची निवडणूक प्रतिष्ठा पूर्वक लढण्यात आली. ही निवडणूक राज्याचे माजी अर्थ मंत्री व वनमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणि पंचायत समिती मुल चे सभापती चंदू मारगोनवार यांच्या मार्गदर्शनात लढण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने सरपंचासह सर्वस जागा जिंकून एक हाती सत्ता हस्तगत केली व विरोधी काँग्रेस पक्षाला चारी मुंड्या चीत केले. साडे तीन वर्षांनंतर थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच करुणा उराडे यांच्यावर ग्रामपंचायत बेंबाळच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव बहुमताने पारित केला. यामुळे त्यांची साडेतीन वर्षाची सरपंच पदाची कारकीर्द संपुष्टात आली.

सरपंच करुणा उराडे यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य नाराज होते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव पाठविला होता. दिनांक 18 जून शुक्रवारला दुपारी 2:00 वाजता विशेष सभा घेऊन अविश्वास प्रस्तावाचा विषय सभेपुढे चर्चिला गेला.यावेळी त्यांच्या वर 10 विरुद्ध शून्य मतांनी ठराव पारित करण्यात आला.एक ग्राम पंचायत सद्स्य स्वप्नील पीट्टलवार हे तटस्थ राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मूल चे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी काम पाहिले . सरपंच करुणा उराडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव विविध कारणाने संमत करण्यात आला. त्यात सदस्यांना विश्वासात न घेणे, सदस्यांचे मत जाणून न घेणे, सदस्यांचे मत प्रोसिडिंग मध्ये न लिहिणे, कोविंड महामारी च्या काळात जनसेवा न करणे, कर्मचाऱ्यांचे पगार न काढणे, शासनाचे परिपत्रक व निर्णयाची मासिक सभेत माहिती न देणे व वाचन करून न दाखविणे, विकासकामांचे ठराव मंजूर झाल्यानंतर अंमलात न आणणे, झालेल्या विकास कामाची देयके न देणे इत्यादी विषयांमुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. सरपंच करुणा उराडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी समाधान व्यक्त केले