ग्रामीण परिसरात लाकडांचे बीट सुरू करा . युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार

68

मूल : रॉकेल विक्रीवरील बंदीमुळे ग्रामीण भागात इंधनाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने शासनाने ग्रामीण परिसरात जळाऊ लाकडाचे बीट सुरू करावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार यांनी केली आहे.

प्रत्येक घरचा स्वयंपाक हा गॅस शेगडीवर झाला पाहीजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने रॉकेल विक्रीवर बंदी आणून व्यापक प्रमाणात माफक दरात मागेल त्याला गॅस योजना राबविली. सदर योजना राबविताना शासनाने रॉकेल विक्रीवर बंदी आणल्यामुळे आज घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचला असला तरी ग्रामीण भागातील अनेक घरात आजही चुलीवरच स्वयंपाक केल्या जात आहे. गांवालागतच्या जंगलातून किंवा शेतात लावलेले झाड तोडून ग्रामीण जनता गरज भागवित आहे. असे असले तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे महिला जंगलात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जळाऊ लाकडांची समस्या गंभीर झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी सोबतच स्वयंपाकाच्या गॅसचेही दर भरमसाठ वाढले आहे. त्यामुळे शेती आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या ग्रामीण जनतेला स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर घेणेही कठीण झाले आहे. रॉकेल बंदीसोबतच स्वयंपाकाच्या गॅसचेही दर वाढल्याने घरी स्वयंपाक करायचा कसा? अशी गंभीर समस्या ग्रामीण महिलांसमोर निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत ग्रामीण जनतेला जळाऊ लाकडांशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु, वन्य प्राण्यांचे हल्ले आणि वृक्ष तोडीवर असलेल्या बंदीमुळे चुल पेटविण्यासाठी लाकडे आणायचे कोठून ? असा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेची चूल पेटविण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने वन विभाग किंवा वन विकास महामंडळाच्या वतीने ग्रामीण भागात जळाऊ लाकडांचे (बीट) विक्री केंद्र सुरू केल्यास जनतेची समस्या दूर होईल, असा आशावाद निलमवार यांनी व्यक्त केला असून वन्य प्राण्याच्या हल्ल्यात होणारी जीवहानी व वृक्षतोडीवर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. करीता शासनाने ग्रामीण भागात जळाऊ लाकडांचे बिट सुरू करावे, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, आ. ॲड.अभिजीत वंजारी यांच्यासह वनमंत्री व अन्य वरिष्ठांकडे निवेदनाव्दारे केली आहे.