भेजगाव येथे वीज व आरोग्यकेंद्र मंजूर करा सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

66

मूल : तालुक्यातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव असलेल्या भेजगाव येथे ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्र आणि आरोग्य केंद्र त्वरित मंजूर करावे, अशी मागणी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भेजगाव परिसरातील चक घोसरी व ताडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीवर मोटारपंप लावले आहेत. परंतु नेहमीच विद्युत पुरवठा बंद होत असल्याने कृषीपपं निकामे ठरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात ३३/११ के.व्ही.ची वीजजोडणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

तसेच भेजगाव परिसरात ५० ते ६० गावे येत असून लोकसंख्या भरपूर आहे. आरोग्याच्या सोयीसुविधांसाठी बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्र २० ते २५ किमी अंतरावर येत असल्याने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ते गरसोयीचे होत आहे. प्रसंगी रुग्णांवर त्वरित उपचार होत नसल्याने अनेक रुग्णही दगावले आहेत. करिता ग्रामीण जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने भेजगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भेजगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित मंजूर करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.