‘पीएफ’ खाते ‘आधार’शी लिंक कसे कराल?

59

नवी दिल्ली: एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गेनायझेशनने (ईपीएफओ) आपल्या नियमात बदल केले आहेत. 1 जूनपासून लागू झालेल्या या नव्या नियमानुसार आता पीएफ अकाउंट आधारशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. नव्या नियमानुसार तुमचं पीएफ अकाउंट आधारशी संलग्न नसेल तर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसानही सोसावं लागू शकतं.

नव्या नियमानुसार आता आधार कार्डला पीएफ अकाउंट व्हेरिफाय करावं लागणार आहे. तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात, त्या कंपनीने तुमचा आधार नंबर पीएफ अकाउंटशी व्हेरिफाय करणं बंधनकारक आहे. ही त्या कंपनीची जबाबदारी आहे.

तसं नाही झालं तर कंपनीकडून येणारी रक्कम मिळणार नाही. त्यावर उपाय म्हणजे कंपनी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सहकार्याने पीएफ अकाउंट लिंक करून घ्यावं. नाही तर 1 जूननंतर तुमच्या जमा रकमेवर परिणाम होऊ शकतो. नव्या नियमात यूएनला (UAN) आधारशी व्हेरिफाय करावा लागणार आहे.

ईपीएफओ (EPFO) ने सोशल सिक्युरिटी कोड 2020च्या कलम 142 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने सर्व कंपन्यांना 1 जूनपर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते आधारशी लिंक करण्याचे आणि ते व्हेरिफाय करण्याचे निर्देश दिले होते. 1 जूनपर्यंत आधारशी खाते लिंक केलं नाही तर इलेक्ट्रॉनिक चलान किंवा रिटर्न भरता येणार नाही.

अशा परिस्थितीत कंपनीकडून पीएफमध्ये देण्यात येणारं योगदान थांबवलं जाईल. त्यामुळे कंपनीचा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

ईपीएफओने याबाबतची अधिसूचना जारी केली होती. त्यात 1 जूनपर्यंत पीएफ खात्याशी आधार लिंक करण्यास सांगितलं होतं. तसं न केल्यास 1 जूनपासून ईसीआर भरला जाणार नाही. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे पीएफ खाते आधारशी लिंक नसेल तर कंपनी आणि कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?
1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा
2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा
3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा.
4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.