जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो?

34

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन – World Environment Day म्हणून साजरा केला जातो.

1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.

पर्यावरण दिन का साजरा करतात?

जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, “आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय – स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे.”

पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.

पर्यावरण

दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक थीम ठरवली जाते आणि एक देश त्यासाठी ‘होस्ट’ अथवा यजमान असतो.

यावर्षीची थीम काय आहे?

2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं.

वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.

पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली.

जागतिक पर्यावरण दिन- ५ जून

मूळ संकल्पना व सुरुवात

१९७२ साली युनोच्या  सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे.

अधिक माहिती

पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत. कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे! २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे. चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे!