‘एमपीएससी’कडून नवीन ऑनलाइन प्रणाली विकसित उमेदवारांना खाते अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना

46

मुंबई – एमपीएससीकडून उमेदवारांच्या सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञांचा वापर करून नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी गुरुवारपासून ही नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, त्यांना या प्रणालीमध्ये नोंदणी करण्याचे आणि आपले खाते अद्ययावत (अपडेट) करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा नसली तरी कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना खात्याचे अपडेशन करावे लागणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता शासनाच्या संबंधित विभागाच्या मागणीनुसार एमपीएससीमार्फत जाहिरातीस अनुसरून उमेदवारांकडून प्राप्त होणारे अर्ज आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची पद्धत २०१० पासून सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या प्रणालीच्या देखभालीच्या कामाकरिता २०१३ मध्ये महाआयटीची नेमणूक करण्यात आली होती. आता या संस्थेमध्ये बदल करण्यात आला असून अर्ज प्रणाली नव्याने विकसित करण्यात आली आहे. या नवीन प्रणालीने उमेदवारांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. ही नवीन अर्ज प्रणाली कार्यान्वित करताना उमेदवारांनी यापूर्वीच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील त्यांना उपलब्ध करून दिलेली माहिती अद्ययावत करणे व अधिकाधिक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याकरिता त्यांच्या खात्याचा पासवर्ड अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील खाते उमेदवारांना वापरता येणार नाही, अशा सूचना आयोगाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

असे करा खाते अद्ययावत
नवीन प्रणालीसाठी उमेदवारांना नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर वैध युजर नेम आणि ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर देऊन आपला कार्यान्वित नंबर द्यायचा आहे. सुरक्षा कोड मिळाल्यानंतर तो टाकून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नवीन पासवर्ड टाकल्यानंतर सध्याच्या उमेदवारांची लॉगिन माहिती कार्यन्वित राहणार नाही, याची खबरदारी उमेदवारांनी घ्यायची आहे. नवीन ईमेल आयडी आणि नंबरद्वारे नवीन पासवर्ड टाकून त्यांना खात्यावर लॉग इन करता येणार आहे.