Vijay Wadettiwar on Lockdown : राज्यातील लॉकडाऊनचं काय होणार? मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

52

Maharashtra Lockdown: राज्यात सध्या 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. 1 जून रोजी लॉकडाऊन उठणार की त्यापुढेही सुरु राहणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र यासंदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊनसंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊनमधून सूट देताना ती 3-4 टप्प्यांत दिली जाईल, असं वडेट्टीवार म्हणाले.

 

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, रेड झोनमधील गावांबाबत सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. ज्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी, असा विचार आहे. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा सरकारचा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत, असं वडेट्टीवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीआधी मीडियाशी बोलताना सांगितलं.

 

मुंबई लोकल संदर्भात बोलताना ते म्हणाले की, मुंबईची लोकल सुरु करण्याला अनेकांचा विरोध आहे. कारण तिथे कोरोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

 

काय आहे शक्यता?
सरकारने लागू केलेल्या या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्यामुळे लॉकडाऊन उठवावा अशी मागणी व्यापाऱ्यांपासून नागरिक करत आहेत. आजच्या बैठकीत लॉकडाऊन उठणार का, निर्बंध शिथिल होणार की लॉकडाऊन कायम राहणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. दरम्यान लॉकडाऊनबाबत राज्य सरकार सध्या दोन प्रस्तावांचा विचार करत असल्याचं समजतं. पहिला प्रस्ताव म्हणजे 1 किंवा 7 जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करणं. परंतु राज्यातील अनलॉक प्रक्रिया चार टप्प्यामध्ये पार पडेल, असंही म्हटलं जात आहे.

…तरच लॉकडाऊन उठू शकतो- मंत्री अस्लम शेख

शिवाय मुंबई शहराचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन एकदम उघडणार नाही, असं सांगितलं होतं. 50 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो , असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं होतं. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार नक्की करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं. कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील असंही अस्लम शेख म्हणाले होते.