ब्रह्मपुरीत कारमधून दारूसाठा जप्त, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

26

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून कारने येणारा दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या दारूसाठ्याची किंमत ९६ हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पवनी येथून ब्रह्मपुरीला दारू आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चंद्रपूर-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी केली. याचदरम्यान मारोती झेन कार येत होती.

पोलिसांना या वाहनावर संशय आला. त्यांनी वाहन थांबवून झडती घेतली. वाहनात देशी दारूचे दहा बॉक्स आढळून आले. त्याची किंमत ९६ हजार रुपये आहे. वाहनातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. दारू, वाहन आणि मोबाईल असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आशीष दुर्येधन मेश्राम’, रुपेश गोपीचंद तिघरे यांना अटक करण्यात आली. दोघेही आरोपी भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या पवनी येथील आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कमचारी गणेश भोयर, प्रदीप मडावी, केमेकर यांनी केली.