मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

29

मुंबई | राज्यात कोरोनाच्या लाटेने थैमान घातलं आहे. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र तरीही काहीजण कोरोनाबाधित असतानाही कोरोनाचा फैलाव करताना दिसत आहेत. होम आयसोलेशनच्या नावाखाली रूग्ण घरी राहतात मात्र काही बाहेर फिरत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. संबंधित जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होेते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयाबाबत माहिती दिली.

बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे आणि नागपूर या 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण बाहेर पडतात या गोष्टींना आळा बसेल म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, काही रूग्ण हातावर शिक्का असतानाही बाहेर पडलेले निदर्शनास आलं. आयसोलेशनमध्ये असलेल्या प्रत्येक रूग्णाच्या घरी एक शौचालय असल्याने कोरोनाचे जंतू पसरण्याचा धोका संभावतो. त्यामुळे रूग्णाच्या घरातील नागरिकांनाही कोरोना होण्याची शक्यता असते.