“म्‍युकरमायकोसिसच्‍या चंद्रपूर जिल्‍हयातील रूग्‍णांसाठी खनिज विकास निधी अंतर्गत ५ लाख पर्यंत खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा”

40

चंद्रपूर : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयातील सहा रूग्‍णालयात म्‍युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय तसेच सामान्‍य रूग्‍णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाहीत. अनेक रूग्‍ण खाजगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. हा खर्च सर्वसामान्‍य रूग्‍णांना परवडणारा नाही. त्‍यामुळे चंद्रपूर जिल्‍हयातील म्‍युकरमायकॉसीस या आजाराच्‍या रूग्‍णांवर खनिज विकास निधी अंतर्गत ५ लक्ष रू. इतका खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

यासंदर्भात जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांना पाठविलेल्‍या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे, चंद्रपूर जिल्‍हयात कोरोना महामारीच्‍या संकटात म्‍युकरमायकॉसीस या आजाराचे संकट उद्भवले आहे. या क्षणापर्यंत म्‍युकरमायकॉसीस चे ५४ रूग्‍ण आपल्‍या जिल्‍हयात आढळले आहेत. त्‍यापैकी ३३ रूग्‍णांवर शस्‍त्रक्रिया झाल्‍या असून दुर्देवाने एकाचा मृत्‍यु झाला आहे. हा बुरशीजन्‍य आजार जिवघेणा असून अनेक रूग्‍णांना आपले डोळे, जबडा गमवावा लागतो व आयुष्‍यभर त्‍याची भरपाई होवू शकत नाही.

यासंदर्भात सार्वजनिक आरोग्‍य मंत्री मा. श्री. राजेशजी टोपे यांच्‍याशी पाठपुरावा करून आम्‍ही सदर आजाराचा समावेश महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत करण्‍याचा निर्णय घ्‍यायला लावला. या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्‍हयात सहा खाजगी रूग्‍णालये आहेत. मात्र त्‍यापैकी एकाही रूग्‍णालयात म्‍युकरमायकॉसीस या आजारावर उपचार करता येवू शकत नाही. सामान्‍य रूग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रूग्‍ण खाजगी रूग्‍णालयांमध्‍ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्‍येक रूग्‍णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्‍यामुळे रूग्‍णाच्‍या कुटूंबियांचे आर्थिकदृष्‍टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहे. महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेअंतर्गत आपण सदर रूग्‍णांना उपचार देवू शकत नसल्‍याने खनिज विकास निधी अंतर्गत या रूग्‍णांचा पाच लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण उचलणे आवश्‍यक आहे, किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. चंद्रपूर जिल्‍हयातील जनता सहनशील आहे. जिल्‍हयात रोज ५०० च्‍या वर कोरोना रूग्‍ण आढळत आहे. अश्‍यातच म्‍युकरमायकॉसीस चे संकट उद्भवल्‍याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. ही बाब लक्षात घेता सदर रूग्‍णांचा ५ लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन उचलणे गरजेचे आहे, किंबहुना ही आपली जबाबदारी आहे. एक मृत्‍यु झाला आहे. हे संकट अधिक गडद होण्‍याआधी तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत सदर रूग्‍णांसाठी ५ लक्ष रू. खर्च उचलण्‍याचा निर्णय घेण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.