सिंदेवाहीत हातभट्टीवर धाड; दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

44

चंद्रपूर : सिंदेवाही पोलिसांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टीवर धाड टाकून मोह दारूसह मुद्देमाल जप्त केला आहे. मौजा शिवणी, वासेरा, अंतरगाव अशा विविध ठिकाणी दारू विक्रेत्यांच्या घरी व जंगल परिसरामध्ये सिंदेवाही पोलिसांनी सर्च अभियान राबवून हातभट्टी मोहा दारू उद्ध्वस्त करून दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपीविरोधात एकूण तीन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये मोहा सडवा, मोहा दारू, हातभट्टी साहित्य असा एकूण एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे.

सिंदेवाही पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू गाळणारे तसेच विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश घारे, पीएसआय गोपीचंद नेरकर, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर ढोकळे, सतीश निनावे, राहुल रहाटे, मंगेश श्रीरामे, अरविंद मेश्राम आदींनी केली.