मूल येथील भोजन व्यवस्थेवरून कोरोना केअर सेंटरमध्ये गोंधळ,पहिल्याच दिवशी भोजन पुरवठ्याचे कंत्राट रद्द

39

मूल : गृहअलगीकरणाची सोय नसलेल्या तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचार घेता यावे म्हणून प्रशासनाने मूल येथे उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषदेची नवनिर्मित मॉडेल शाळा आणि एसएम लॉन येथे कोरोना केअर सेंटर निर्माण केले. तीनही कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारार्थ असलेल्या रुग्णांना चहा, नास्ता आणि दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि गणेश कॅटरिंगला कंत्राट दिला आहे.

                                          या दोन्ही कंत्राटदाराकडून नियमित आणि वेळेवर रुग्णांना पुरेसे भोजन मिळत होते. त्यामुळे रुग्णही समाधानी होते, असे असताना जिल्हा प्रशासनाने या दोन्ही कंत्राटदारांना बदलवून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून मसराम नामक व्यक्तीला तीनही कोरोना केअर सेंटरमधील रुग्णाला चहा, नास्ता आणि भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. परंतु, भोजन पुरविण्याची जबाबदारी स्वीकारलेल्या मसराम यांच्याकडून रविवारी भोजन पुरविण्याच्या पहिल्याच दिवशी अपुरे, निकृष्ठ आणि उशिराने भोजन मिळाल्याने सेंटरमधील कोरोना बाधित संतप्त झाले.

                                         दरम्यान, हा प्रकार काँग्रेस आणि भाजपा पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर गैरप्रकार थांबविण्याची गळ घातली. दरम्यान प्रभारी तहसीलदार यशवंत पवार, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर आणि न.प. मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी स्थानिक कोरोना केअर सेंटरला भेट देऊन परिस्थिती जाणून घेत तासभर चाललेला गोंधळ शांत केला.

                                                 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रकाराची दखल घेत पूर्वीच्याच स्थानिक कंत्राटदारास कायम ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. त्यामुळे मसराम यांचे कत्राट पहिल्याच दिवशी रद्द करण्याची नामुष्की समाजकल्याण विभागावर ओढावली.

         मूल येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारार्थ असलेल्या नागरिकांना उशिराने भोजन मिळाल्याने कोरोनाग्रस्तांनी नाराजी व्यक्त करीत  गोंधळ घातल्याची घटना मूल येथील कोरोना केअर सेंटरमध्ये घडली.