विनाकारण फिरणा—या नागरिकांवर प्रशासनाचा वचक

45

मूल प्रतिनिधी :—कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लागु केलेल्या ब्रेक दी चैनचा आदेश अंमलात असताना अनेक नागरीक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामूळे कोरोनाची साखळी तुटण्या ऐवजी दिवसागणीक तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. अश्या परिस्थितीत ब्रेक दी चैन आदेशाचे उल्लंघन करून अनेक नागरीक किराणा सामान तर काहीजन औषधी घेण्याचे, काही मंडळी भाजीपाला तर काही बेकरीत जात असल्याचे कारण सांगुन घराबाहेर निघत आहे. यामुळे लाँकडाऊनच्या काळातही स्थानिक गांधी चौक आणि मुख्य मार्गावर नागरीकांची गर्दी दिसुन येते. नागरीकांची ही कृती नियमबाह्य असुन कोरोनाचा संसर्ग वाढविणारी आहे.

त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरीकांवर वचक बसावा म्हणुन आज सकाळी स्थानिक गांधी चौकात महसुल प्रशासन, पोलीस विभाग आणि नगर प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबविली.

मोहीमे अंतर्गत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सतिशसिंह राजपुत, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री रामटेके, नायब तहसिलदार यशवंत पवार, पृथ्वीराज साधनकर आणि नगर परीषद अधिक्षक तुषार शिंदे यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना थांबवुन कोरोना अँन्टीजन तपासणीची धडक मोहीम राबविली.

राबविलेल्या मोहीमेत कर्मचाऱ्यांनी ६८ जणांची स्थानिक पञकार भवनात अँटीजन तपासणी केली तर तीन दुचाकी चालान करण्यात आल्या. तपासणी दरम्यान ६ जण कोरोना बाधीत असल्याचे निदर्शनास आले. आज राबविलेल्या मोहीमे प्रमाणे प्रशासनाने दररोज मोहीम राबवुन विनाकारण रस्त्यावर फिरणा-या नागरीकांची तपासणी केल्यास निर्माण झालेली कोरोनाची साखळी तुटण्यास फार काळ लागणार नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले.