चंद्रपुरात स्थानिक युवकांचा पुढाकार, ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ मार्फत मोफत ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप

41

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्थानिक युवकांच्या पुढाकाराने स्थापन झालेली ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ कोरोनाच्या संकट काळात अनेकांचे जीव वाचवण्यात उपयोगी ठरत आहे. वरोरा शहरातील गांधी उद्यान योग मंडळाच्या 12 कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात एकत्र येत ही ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ तयार केली आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या वरोरा शहरातही ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ अथक परिश्रम करत रुग्णांपर्यत मोफत ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आकडेवारी सातत्याने वाढत आहे. शहरी आणि ग्रामीण भाग याला अपवाद नाहीत. चंद्रपूर-वरोरा-ब्रम्हपुरी-चिमूर हे तालुके कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत अग्रस्थानी आहेत. पुढील 10 दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजारांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.

एकीकडे जिल्ह्यात रुग्णांसाठी खाटांची प्रचंड कमतरता असताना दुसरीकडे ऑक्सिजनची सोय करताना नातेवाईकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. अशातच गांधी उद्यानात नियमितपणे योगाभ्यास करणारे युवक यासाठी काय उपाय करता येतील याच्या शोधात होते. त्यातूनच मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्याची कल्पना पुढे आली. मात्र सदस्यांपैकी कुणीही यात तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षित नसल्याने सेवा सुरु करणे धाडसाचे होते. मात्र ऑक्सिजनविना प्राण जात असताना फारसा विचार करायला वेळ नव्हता. 3 सिलेंडरपासून कामाला सुरुवात झाली आणि आता या ब्रिगेडकडे 40 ऑक्सिजन सिलेंडर आहेत. या उपक्रमाची माहिती झाल्यावर रोज कार्यकर्त्यांना सुमारे 100 कॉल येत आहेत.सिलेंडर भरुन आणण्यासाठी चंद्रपूरची पडोळी MIDC गाठावी लागत आहे. मात्र सर्व अडथळे पार करुन बेडवर हतबल पडून असलेल्या रुग्णाला वाचवण्यासाठी ‘ऑक्सिजन ब्रिगेड’ सर्वशक्तीने कार्यरत आहे. सिलेंडर पोहोचवणे, सॅनिटाईज करणे, मोफत मास्कची सोय करुन कोरोना संकटकाळात वरोरा येथील ‘ऑक्सिजन ब्रिगेड’चे सदस्य करत असलेल्या कामाविषयी सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.