चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात भीषण आग; कोळसा वाहून नेणारे कन्व्हेअर बेल्ट जळाले

46

चंद्रपूर – चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संच क्रमांक 8 आणि 9 मध्ये कोळसा घेऊन जाणारा कन्व्हेअर बेल्ट जळाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग भीषण असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. माहिती मिळेस्तोव आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या घटनेत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.

ही आग शॉर्ट सर्किटने लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. येथे वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागतो. रविवारी रात्री संच क्र. 8 आणि 9 हे मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता. याच वेळी आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत कोळसा वाहून नेणारे दोन कन्व्हेअर बेल्ट जळून गेले. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वृत्त लिहेपर्यंत आग बऱ्यापैकी आटोक्यात आणण्यात आली होती. यात नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. याबाबत मुख्य अभियंता सपाटे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.